लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी बेळगाव सायबर क्राईम पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ डिसेंबर २०२४ रोजी इन्स्टाग्राम मेसेंजरद्वारे अल्पवयीन मुलांचे अश्लील व्हिडिओ शेअर करणाऱ्या श्रीनाथ पाटील याच्याविरोधात केंद्र सरकारच्या ‘इंडियन सायबर क्राईम को-ऑर्डिनेशन सेंटर’ने (I4C) गंभीर दखल घेतली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार बेळगाव सायबर क्राईम विभागाचे हवालदार गंगाधर यांनी दिलेल्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करत आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलांशी संबंधित अश्लील चित्रे, व्हिडिओ किंवा इतर आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर शेअर करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा कृत्यांमध्ये सामील असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.


Recent Comments