पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील पूरस्थिती टाळण्यासाठी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने खबरदारीचे पाऊल उचलले आहे. फोर्ट रोडवरील जिजामाता चौकाजवळ नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, संपूर्ण गाळ काढण्यासाठी स्मार्ट सिटी आणि महापालिकेने संयुक्त सहकार्य करावे, असे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ सुदाम हरिविजय मंचलवार यांनी केले आहे.


बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने आज सकाळी ६ वाजल्यापासूनच जिजामाता चौकाजवळील नालेसफाईसाठी स्वच्छता कामगार, जेसीबी आणि डंपरसह मोठी मोहीम सुरू केली आहे. सीबीटी बस स्थानकाच्या बाजूने वाहून येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचऱ्याचे ढीग जिजामाता चौकाजवळ अडकल्याने पाण्याचा प्रवाह खंडित होत आहे. हा नाला सुमारे ६ फूट खोल असून त्यावर काँक्रीटचे स्लॅब टाकण्यात आल्याने कामासाठी केवळ ३ फुटांची जागा उपलब्ध होत आहे. यामुळे जेसीबीने कचरा काढण्यात अडचणी येत असून, लहान बादल्यांचा वापर करून काम करावे लागत असल्याने मोहिमेचा वेग मंदावला आहे.


या संदर्भात माहिती देताना कॅन्टोन्मेंटचे सीईओ सुदाम मंचलवार हरिविजय यांनी सांगितले की, “हा नाला स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत येत असल्याने स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी नाल्यावरील काँक्रीटचे कव्हर सुमारे १२ फुटांपर्यंत काढून द्यावे. तसेच महापालिकेने अतिरिक्त जेसीबी आणि डंपर देऊन सहकार्य केल्यास अवघ्या १५ दिवसांत संपूर्ण नाला स्वच्छ करता येईल. अन्यथा संपूर्ण व्यावसायिक भागात पाणी शिरण्याची भीती आहे. कोणत्याही परिस्थितीत सफाई कर्मचाऱ्यांना मॅन्युअली नाल्यात उतरवले जाणार नाही, केवळ यंत्रसामग्रीच्या साहाय्यानेच ही स्वच्छता केली जाईल.” या संयुक्त मोहिमेला बेळगाव स्मार्ट सिटी आणि महापालिकेने त्वरित प्रतिसाद द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.


Recent Comments