मॅट्रिमोनी ॲपवर वर संधोधन करणाऱ्या बेळगावमधील एका तरुणीला नेदरलँड्सचा दंतवैद्य असल्याचे भासवून ३.३८ लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बेळगावमधील सायबर गुन्हा (सीईएन) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बेळगावमधील अश्विनी (नाव बदललेले आहे) नामक तरुणीने मॅट्रिमोनी ॲपवर नोंदणी केली असता, तिची ओळख मूळचा हैदराबादचा आणि सध्या नेदरलँड्समध्ये दंतवैद्य असलेल्या आर्यनकुमार नावाच्या व्यक्तीशी झाली. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचा विश्वास संपादन केला आणि २५ मे रोजी भारतात येत असल्याचे सांगितले. दुसऱ्याच दिवशी त्याने दिल्ली विमानतळावर पोहोचल्याचे सांगून तिथे अडकल्याचे नाटक केले. त्यानंतर विमानतळ अधिकारी असल्याचे भासवून एका अज्ञात महिलेने तरुणीशी संपर्क साधला. आर्यनकडे परदेशी चलन जास्त असल्याने ते भारतीय चलनात बदलण्यासाठी ८५,८०० रुपये कस्टम शुल्क भरण्यास सांगून तरुणीकडून पैसे ट्रान्सफर करून घेतले.

यानंतर त्याच महिलेने पुन्हा फोन करून आर्यनकडे सोने आणि हिऱ्याचे दागिने असून त्याच्या क्लिअरन्ससाठी जीएसटी स्वरूपात २.५३ लाख रुपयांची मागणी केली. यावर विश्वास ठेवून तरुणीने संशयितांनी दिलेल्या बँक खात्यावर एकूण ३.३८ लाख रुपये जमा केले. पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर संशयितांचे फोन बंद झाले, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आले. याप्रकरणी पीडितेने बेळगावमधील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. सोशल मीडिया किंवा मॅट्रिमोनी ॲपवरील अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून नागरिकांनी पैशांचे व्यवहार करू नयेत, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.


Recent Comments