Belagavi

आरसीबीच्या विजयानंतर बेळगावमध्ये चाहत्यांचा जल्लोष

Share

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने सलग दुसरा विजय मिळवल्यानंतर बेळगावमध्ये क्रिकेट चाहत्यांनी मोठा आनंद व्यक्त केला. शहरातील राणी चन्नम्मा चौकात एकत्र येत हजारो चाहत्यांनी मध्यरात्री फटाक्यांची आतिशबाजी करत विजयोत्सव साजरा केला.

बेंगळुरू संघाचा विजय निश्चित होताच बेळगावमधील राणी चन्नम्मा चौकात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. शहराच्या विविध भागांतून आलेले हजारो क्रिकेट चाहते चौकात जमा झाले आणि त्यांनी आरसीबीच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. या विजयोत्सवादरम्यान आरसीबी संघाचा लोगो आणि खेळाडूंचे स्टिकर्स लावलेली एक कार सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

यावेळी चाहत्यांनी संघाची जर्सी परिधान करून आणि हातात आरसीबीचे ध्वज घेऊन रस्त्यावर एकत्र येत आनंद साजरा केला. चौकातील वाढती गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवून वाहनधारकांना अडचण होणार नाही याची काळजी घेतली आणि विजयोत्सव शांततेत पार पडला.

Tags: