Belagavi

म. ए. समितीतर्फे १ जून रोजी हुतात्मा दिन पाळणार

Share

महारष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागातर्फे १ जून रोजी हुतात्मा दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कन्नडसक्तीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ मोठ्या संख्येने जमून आदरांजली वाहण्याचे आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

महारष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या निवासस्थानी संघटनेची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी सांगितले की, १ जून रोजी कन्नडसक्तीच्या धोरणाविरोधातील लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना हिंडलगा येथील स्मारकाजवळ अभिवादन केले जाईल. तसेच, कन्नडसक्तीच्या नावाखाली सुरू असलेल्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या भव्य निषेध मोर्चाला युवा समितीने पूर्ण पाठिंबा जाहीर केला.

सीमाप्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी करत या लढ्याला अधिक बळ देण्यासाठी ‘एक लाख सह्यांची मोहीम’ राबवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या मोहिमेत सीमाभागातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि म. ए. समिती मध्यवर्ती समितीने निश्चित केलेल्या निषेध रॅलीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीला संघटनेचे प्रमुख मनोहर हुंदरे, पीराजी मुचंडीकर, इंद्रजित धामणेकर, नारायण मुचंडीकर, सुधीर शिरोळे, सचिन दळवी आणि रमेश माळवी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: