Belagavi

सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळाची आठवण काढत लक्ष्मी हेब्बाळकर यांची भावूक पोस्ट

Share

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या लोककल्याणकारी कार्यकाळाची आणि व्यक्तिमत्त्वाची आठवण काढत माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला, तरी लोकांच्या हृदयातून ते कधीही उतरू शकत नाहीत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

म्हैसूरमधील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन कर्नाटकच्या सर्वोच्च मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचल्यानंतरही, आपल्या सत्तेच्या शेवटच्या क्षणापर्यंत गरिबांचा, मागासलेल्यांचा आणि शोषितांचा आवाज बनून राहणारे आमचे लाडके नेते सिद्धरामय्या आहेत, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हटले आहे.

कर्नाटकच्या राजकीय इतिहासात सामाजिक न्याय, समान संधी आणि लोकभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून त्यांनी लिहिलेला अध्याय कधीही पुसला जाऊ शकत नाही. ते केवळ मुख्यमंत्री नव्हते, तर अनेक गरीब कुटुंबांची आशा, असंख्य तरुणांचे स्वप्न आणि कोट्यव्हो लोकांचा आत्मविश्वास होते, अशा शब्दांत त्यांनी सिद्धरामय्या यांच्या आठवणींना उजाळा दिला.

माझ्या वैयक्तिक आयुष्यातही सिद्धरामय्या हे केवळ एक राजकीय नेते नव्हते. मी जेव्हा जेव्हा संकटांचा सामना केला, तेव्हा त्यांनी पित्याप्रमाणे माझ्या पाठीवर हात ठेवून मला धीर दिला आणि माझ्यावर विश्वास ठेवून संधी दिली. त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळणे हा माझ्या राजकीय जीवनातील अत्यंत अमूल्य अध्याय आहे, अशी प्रतिक्रिया लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

राजकारणात सत्ता आणि पदे शाश्वत नसतात, पण जनतेसाठी जगणाऱ्या नेत्याची सेवा, त्यांचे आदर्श आणि आशीर्वाद नेहमीच कायम राहतात. सिद्धरामय्या सत्तेच्या खुर्चीवरून दूर झाले असले, तरी त्यांनी उभारलेली सामाजिक न्यायाची चळवळ, गरिबांविषयीची भूमिका आणि लोककल्याणकारी राजकारण आपल्याला नेहमीच पुढे जाण्याची प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन त्यांनी केले.

पुढील काळातही त्यांचे अनुभव, मार्गदर्शन आणि आशीर्वाद आपल्याला बळ देत राहो. कर्नाटकचा विकास, समानता आणि सलोख्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्याच मार्गावर खंबीरपणे वाटचाल करूया, असे आवाहन त्यांनी केले.

नेतृत्व म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर लोकांच्या हृदयात कधीही न पुसली जाणारी ओळख निर्माण करणे होय. अशा दुर्मिळ नेत्याला माझे मनापासूनचे प्रेम आणि आदर. आदरणीय सिद्धरामय्या यांना माझे प्रणाम, असे म्हणून लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

Tags: