Belagavi

बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीच्या अग्निवीरांचे दीक्षांत संचलन

Share

अग्निपथ योजनेअंतर्गत बेळगावमधील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये २४ आठवड्यांचे सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ७ व्या तुकडीच्या ७६५ अग्निवीर प्रशिक्षणार्थींचे शानदार दीक्षांत संचलन पार पडले.

या दीक्षांत संचलनाचे नेतृत्व अग्निवीर संकेत सिंग यांनी केले, तर मेजर गजानन पाटील यांनी परेडचे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहिले. लष्करी परंपरेनुसार आयोजित या कार्यक्रमात कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्ये यांनी मानवंदना स्वीकारली आणि परेडचे निरीक्षण केले. या सोहळ्याला एमएलआयआरसीचे वरिष्ठ अधिकारी, अग्निवीरांचे पालक, माजी सैनिक, एनसीसी कॅडेट्स आणि विविध शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते.

भारतीय लष्कराच्या इतिहासातील सर्वात जुन्या पायदळांपैकी एक असलेल्या मराठा लाईट इन्फंट्री केंद्रात दिले जाणारे प्रशिक्षण सैनिकाच्या जीवनात शिस्त, शारीरिक सक्षमता आणि देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते. सैनिकांनी सेवेत असतानाही ही शिस्त कायम राखली पाहिजे, असे ब्रिगेडियर गिरीश उपाध्ये यांनी म्हटले.

याच प्रसंगी अग्निवीर प्रशिक्षणाच्या विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सैनिकांना पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट अग्निवीर नेता म्हणून यशवंत घाडगे यांना आणि व्हिक्टोरिया क्रॉस पदक घोलप आदर्श यांना देण्यात आले.

यानंतर, ब्रिगेडियर गिरीश उपाध्ये यांनी शर्कत युद्ध स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांना आदरांजली वाहिली.

Tags: