बेळगावमधील शिवबसवनगर येथील कारंजीमठात १ जून रोजी ३०० वा विशेष शिवानुभव सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न होणार असून, या निमित्ताने राज्यातील प्रमुख मठाधीश आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

गेल्या २६ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या मासिक शिवानुभव व्याख्यानमालेने आता एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मठाच्या शिवानुभव मंडपात , हा अभूतपूर्व विशेष शिवानुभव कार्यक्रम संध्याकाळी ६ वाजता सुरू होणार आहे.

या सोहळ्याला निडसोसी येथील दुरदुंडेश्वर सिद्धसंस्थानमठाचे जगद्गुरू पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी यांची दिव्य उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खडकलाट येथील कुमारेश्वर विरक्तमठाचे शिवबसव महास्वामी असणार असून, कारंजीमठाचे गुरुसिद्ध महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली ही धार्मिक सभा संपन्न होईल. या वेळी ताळीकोटी येथील खासतेश्वरमठाचे उत्तराधिकारी सिद्धलिंग देव भाविकांना संबोधित करताना विशेष व्याख्यान देतील. कारंजीमठाच्या कुमारेश्वर संगीत पाठशाळेतील विद्यार्थ्यांच्या भक्तीमय प्रार्थनेने या मंगल कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, या सोहळ्याला सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सेवा रुजू करावी, असे आवाहन श्रीमठाच्या वतीने करण्यात आले आहे.


Recent Comments