मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटकात नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी दोन ते तीन दिवसांत होणार आहे. डी के शिवकुमार नवे मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानले जात असून, नव्या सरकारमध्ये चार उपमुख्यमंत्री पदे निर्माण होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये विजापूरचे नेते एम. बी. पाटील यांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेस हायकमांड विविध समुदायांना राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी नव्या सरकारमध्ये तीन ते चार उपमुख्यमंत्री पदे निर्माण करण्याच्या विचारात आहे. या पदांसाठी प्रियांका खरगे, एम. बी. पाटील, जमीर अहमद खान आणि डॉ. यतींद्र सिद्धरामय्या यांच्या नावांची प्रामुख्याने चर्चा आहे. विजापूरमधील बबलेश्वर मतदारसंघाचे आमदार आणि उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांचे नाव वीरशैव-लिंगायत समाजाचेप्रतिनिधी म्हणून आघाडीवर आहे. उत्तर कर्नाटकातील प्रभावशाली नेते म्हणून त्यांना हे महत्त्वाचे पद मिळण्याची दाट शक्यता आहे.

एम. बी. पाटलांना उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यास आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळांनी दिली आहे. आमच्या जिल्ह्यातील नेत्याला मोठे पद मिळाले तर विकासकामे होतील, माझ्या मनात कोणताही आकस नाही, असे सांगत यत्नाळांनी पाटलांच्या नावाला उघड पाठिंबा दिला आहे.
एम. बी. पाटलांचे भविष्य उज्ज्वल असेल तर ते मुख्यमंत्री झाले तरी आपल्याला आनंदच होईल, असे मार्मिक उद्गार यत्नाळांनी काढले. आपल्याच जिल्ह्यातील व्यक्ती उच्च पदावर बसणार असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे, असे म्हणत त्यांनी पाटलांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
एकंदरीत विजापूर जिल्ह्याला उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यास आणि विशेषतः एम. बी. पाटलांची या पदावर निवड झाल्यास जिल्ह्यात पुन्हा एकदा विकासाचे पर्व सुरू होईल, अशी आशा सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.


Recent Comments