बेळगावमधील उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत न्यायालयीन साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या कुटुंबातील सदस्यावर हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

बेळगाव शहरातील मजगाव येथील शांतसागर कॉलनीचे रहिवासी आणि भांडी दुकानाचे मालक संजय परशुराम नेकनार यांना कोर्टात साक्ष न देण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पिरनवाडी क्रॉस जवळील ‘परशुराम किचनवेअर’ दुकानात ही घटना घडली.

बेळगाव मार्केट पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका प्रकरणात संजय नेकनार हे आरोपी सागर बाळू भोसले याच्याविरुद्ध साक्षीदार आहेत. याच वैमनस्यातून २७ मे २०२६ रोजी रात्री सागर बाळू भोसले याचे नातेवाईक रोहित विठ्ठल गणाचारी आणि रवी वाकोडे (दोघे रा. सिद्धेश्वर गल्ली, पीरणवाडी) यांनी बेकायदेशीरपणे दुकानात प्रवेश केला. या वेळी दुकानात उपस्थित असलेले संजय यांचे भाऊ अनिल परशुराम नेकनार आणि कामगारांसमोर, धमकी दिली. तसेच अनिल नेकनार यांना शिवीगाळ करत मारहाण करत मोबाईल हिसकावून पळ काढला.
या प्रकरणी संजय परशुराम नेकनार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आरोपी रोहित विठ्ठल गणाचारी आणि रवी वाकोडे यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


Recent Comments