Belagavi

​बेळगावात आपत्ती व्यवस्थापन दलाच्या सीपीआयची आत्महत्या

Share

बेळगावमधील आपत्ती व्यवस्थापन दलात कार्यरत असलेले सीपीआय श्रीशैल चौगुले यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. लवकरच डीएसपी पदावर पदोन्नती मिळणार असलेल्या या अधिकाऱ्याच्या निर्णयामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बेळगावच्या राणी चन्नम्मा नगर येथील निवासस्थानी श्रीशैल चौगुले यांनी खोलीचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या पत्नीने पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती दिली. सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत खोलीचा दरवाजा तोडून त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मृत अधिकाऱ्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी बेळगावच्या उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

श्रीशैल चौगुले हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती रमेश पाटील यांनी दिली. ते अत्यंत चांगल्या स्वभावाचे होते आणि घटनेच्या रात्री ९ वाजेपर्यंत त्यांनी फोनवर संवादही साधला होता, ते पोलीस दलात अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावत होते आणि गावामध्येही त्यांचे चांगले व्यक्तिमत्त्व होते, अशा भावना महेश चौगुले यांनी व्यक्त केल्या.

शवविच्छेदन गृहाबाहेर नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला.

Tags: