State

केंद्राच्या धोरणांवर मल्लिकार्जुन खर्गे यांचा ‘स्लो पॉयझनिंग’ म्हणत हल्लाबोल

Share

एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्व बदलाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगणे पसंत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रशासकीय धोरण हे गरिबांचे जगणे कठीण करणारे असून ते एक प्रकारे ‘स्लो पॉयझनिंग’ सारखे आहे, अशी टीका मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. देशात दररोज होणारी किरकोळ दरवाढ सर्वसामान्यांवर मोठा बोजा ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशात बेरोजगारी वाढत असून लघुउद्योग आणि कारखाने बंद होत आहेत, तरीही पंतप्रधान परदेश दौऱ्यांमध्ये व्यस्त आहेत, असा आरोप मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. नीट आणि सीबीएसई परीक्षांमधील सातत्यपूर्ण पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून सरकार याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे त्यांनी म्हटले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची दिल्लीत हाय कमांडसोबत महत्त्वाची बैठक नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील “मुख्यमंत्री बदलणार का?” या प्रसारमाध्यमांच्या थेट प्रश्नावर मल्लिकार्जुन खर्गे यांनी कोणतेही भाष्य केले नाही. त्यांनी केवळ हात जोडून पुढे जाणे पसंत केले. या मौनामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Tags: