Belagavi

बेळगाव कँटोन्मेंट परिसरात प्लास्टिक मुक्तीसाठी स्वच्छता मोहीम

Share

बेळगाव कँटोन्मेंट परिसर प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ करण्यासाठी छावणी परिषदेच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. एमएलआयआरसीचे कमांडंट गिरीश उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली सीईओ सुदाम विजय मंचालकर यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवून अतिक्रमणधारकांना इशारा देण्यात आला.


कँटोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष कमांडंट गिरीश उपाध्याय, आमदार आसिफ सेठ आणि बोर्डाचे सदस्य सुधीर तुप्पेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार सकाळी ६ वाजल्यापासून प्लास्टिक कचरा निर्मूलन मोहिमेला सुरुवात झाली. यामध्ये ८४ सफाई कामगारांनी सहभाग घेत नाले आणि क्रीडांगणांमधून सुमारे १ टन प्लास्टिक कचरा गोळा केला.

या मोहिमेदरम्यान धर्मवीर संभाजी चौक – यंदे खूट परिसरातील नाल्याजवळ धोकादायक वैद्यकीय कचरा आणि प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरलेला हॉटेलचा कचरा आढळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे. कँटोन्मेंट परिसराबाहेरील नागरिक कॅम्प भागातील चंदगड बस स्थानकापासून गणेशपूर आणि हिंडलगा रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे कचरा टाकत असल्याचे समोर आले आहे.

प्लास्टिक कचऱ्यामुळे नाले तुंबून डासांची पैदास होते आणि डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियासारखे आजार पसरतात, अशी भीती सुदाम विजय मंचालकर यांनी व्यक्त केली. याचसोबत कॅम्प परिसरातील काही रहिवाशांनी घरांसमोर लोखंडी शेड व इतर बांधकामे करून रस्त्यांवर अतिक्रमण केल्याचे कारवाईदरम्यान दिसून आले.

अतिक्रमणांमुळे अग्निशामक दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि स्वच्छता वाहनांच्या दळणवळणास अडथळा निर्माण होत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. नागरिकांनी हे अनधिकृत अतिक्रमण त्वरित काढून न घेतल्यास छावणी परिषदेच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देत कचरा केवळ कचरा वेचक वाहनांमध्येच टाकण्याचे आवाहन सुदाम विजय मंचालकर यांनी केले.

Tags: