Belagavi

नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी बेळगावमध्ये युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन

Share

नीट प्रश्नपत्रिका फूट आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या दरवाढीच्या निषेधार्थ बेळगावमध्ये आज युवक काँग्रेसच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार जगदीश शेट्टर यांच्या कार्यालयाला टाळे लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फूट आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या वाढत्या किमतींचा निषेध करण्यासाठी आज बेळगावमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने खासदार जगदीश शेट्टर यांच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

आज बेळगाव जिल्हा आणि ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने ग्रामीण अध्यक्ष कार्तिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला. भाजप सरकारच्या काळात नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका १८ व्यांदा फुटली असून याला भाजप सरकारच जबाबदार आहे, तसेच प्रश्नपत्रिका फुटीमुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि कष्ट वाया गेल्याचा आरोप युवक काँग्रेसचे राज्य अध्यक्ष अब्दुल देसाई यांनी केला.

दरम्यान, खासदार जगदीश शेट्टर यांच्या कार्यालयात प्रवेश देण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी काही वेळ रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. यामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स तोडून खासदार शेट्टर यांच्या कार्यालयाला टाळे लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी सुमारे २० हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

पोलिस गाडीत असतानाही कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत आपला तीव्र आक्रोश सुरूच ठेवला होता.

Tags: