Belagavi

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अध्यक्षपदाचा ब्रिगेडियर गणेश उपाध्ये यांनी स्वीकारला कार्यभार

Share

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष ब्रिगेडियर गणेश उपाध्ये यांनी सोमवारी आपला कार्यभार स्वीकारला आहे. कॅन्टोन्मेंटच्या सभागृहात आयोजित प्रगती आढावा बैठकीत त्यांनी संपूर्ण कॅन्टोन्मेंट परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचे आणि स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे कडक निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

कॅन्टोन्मेंट कार्यक्षेत्रात अनेक ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे असून पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात. पर्यटन स्थळांवर प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी असद खान दर्ग्यासह विविध प्रमुख ठिकाणी जनजागृती फलक लावण्यात यावेत, अशा सूचना ब्रिगेडियर गणेश उपाध्ये यांनी मांडल्या.

बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी मंचलवार हरीविजय यांनी एल अँड टी कंपनीकडून रस्त्यांची खोदाई करून ते तसेच ठेवण्यात आल्याने नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर एल अँड टी कंपनीच्या कामामुळे अपघात होत असून खोडलेले रस्ते त्याच कंपनीकडून दुरुस्त करून घेण्याच्या सूचना ब्रिगेडियर गणेश उपाध्ये यांनी दिल्या. तसेच घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करून नियमित तपासणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

यापूर्वी सोमवारी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सभागृहात आमदार आसिफ सेठ यांनी नवनियुक्त ब्रिगेडियर गणेश उपाध्ये यांचे स्वागत केले. ब्रिगेडियर गणेश उपाध्ये यांच्या नेतृत्वाखाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचा विकास अधिक गतीने होईल, असा विश्वास आमदार आसिफ सेठ यांनी व्यक्त केला.

Tags: