विजापूर शहराच्या बाहेरील बेंगळुरू बायपासवर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी आणखी एक अंडरपास तयार करावा, या मागणीसाठी स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येत आंदोलन केले. संगमेश्वर रुग्णालयाजवळ जमा झालेल्या शेकडो आंदोलकांनी जिल्हा प्रशासन आणि सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बेंगळुरू बायपासजवळ उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, या कामामुळे परिसरातील स्थानिक वसाहतींचा मुख्य संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे. संगमेश्वर रुग्णालयासमोरील रस्त्याचा वापर करणाऱ्या हजारो नागरिकांना, रुग्णांना आणि वाहनधारकांना भविष्यात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन रहिवाशांनी वाहतूक सुलभ होण्यासाठी या ठिकाणी अंडरपास मंजूर करावा, या मागणीसाठी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

स्थानिक रहिवाशांच्या या आंदोलनाला विजापूर महानगरपालिकेच्या भाजप नगरसेवकांनीही पाठिंबा दिला आहे. वॉर्ड क्रमांक २१ चे भाजप नगरसेवक मल्लिकार्जुन गडगी आणि वॉर्ड २२ चे भाजप नगरसेवक प्रेमानंद बिरादार यांनी थेट आंदोलनात सहभाग घेतला. नागरिकांच्या समस्यांसमोर राजकारण आणि पक्ष महत्त्वाचा नसून लोकांचे प्रश्न आधी सुटले पाहिजेत, अशी भूमिका नगरसेवकांनी मांडली. तसेच हा विषय खासदारांच्या कानावर घालून तो सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही सांगण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने विजापूरचे खासदार रमेश जिगजिणगी यांनी या गंभीर समस्येची दखल घेऊन तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिक जनतेचा दळणवळणाचा हक्क हिरावून घेतला जाऊ नये, अशी भावना येथील नागरिकांमध्ये आहे. सत्ताधारी पक्षाचेच नगरसेवक थेट रस्त्यावर उतरल्यामुळे आगामी काळात हे आंदोलन अधिक व्यापक होण्याची चिन्हे आहेत. आता खासदार यावर काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Recent Comments