हुबळीत बांगलादेशी घुसखोर आढळल्यानंतर आता बेळगावमध्येही काही संशयित आल्याची शक्यता निर्माण झाली आहे. श्रीराम सेना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हुबळीहून येणाऱ्या बस शहराच्या प्रवेशद्वारावरच रोखून पोलिसांच्या स्वाधीन केले. सध्या पोलीस संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करत आहेत.

हुबळीच्या मध्यवर्ती बस स्थानकावर काही संशयित बांगलादेशी घुसखोर आढळले होते. त्यानंतर त्यांच्याच गटातील काही संशयित बेळगावच्या दिशेने निघाल्याची गुप्त माहिती हिंदू संघटनांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे श्रीराम सेना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या प्रवेश मार्गावर हुबळीहून येणाऱ्या बस रोखल्या आणि पोलिसांना पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच डीसीपी नारायण बरमणी यांनी घटनास्थळी धाव घेऊन बस ताब्यात घेतल्या आणि मध्यवर्ती बस स्थानकावर आणून प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली. यादरम्यान सापडलेल्या काही संशयितांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

हुबळी बस स्थानकावर संशयित बांगलादेशी घुसखोर आल्याची माहिती मिळताच पोलीस आणि कार्यकर्त्यांनी संयुक्त मोहीम राबवून काहींना ताब्यात घेतले होते. त्यातील काही जण बेळगावकडे आल्याचे समजताच येथील कार्यकर्त्यांनी बस रोखून पोलिसांना सहकार्य केले, अशी माहिती श्रीराम सेनेचे उत्तर कर्नाटक जिल्हाध्यक्ष रविकुमार कोकीतकर यांनी दिली.
सध्या एसीपी संतोष सत्यनाईक, एसीपी बी. आर. गड्डेकर आणि सीपीआय कालीमिर्ची यांच्यासह प्रमुख पोलीस अधिकारी घटनास्थळी आणि पोलीस ठाण्यात तळ ठोकून असून, संशयितांच्या कागदपत्रांची कसून पडताळणी करत आहेत.


Recent Comments