Belagavi

आरएलएस महाविद्यालयात भव्य पदवी प्रदान सोहळा उत्साहात संपन्न

Share

केएलई संस्थेच्या राजा लखमगौडा विज्ञान स्वायत्त महाविद्यालयाचा पदवी प्रदान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी या सोहळ्यात शेकडो विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

यावेळी उपस्थित कर्नाटक राज्य उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. एस. आर. निरंजन यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्राध्यापक व पालकांच्या भूमिकेला महत्त्वाचे मानले. शिक्षणात प्रादेशिक भाषेचा वापर, महाविद्यालयांमध्ये संशोधन केंद्रे आणि मूळ विज्ञानासोबत कृत्रिम बुद्धिमत्ता व नवीन तंत्रज्ञान शिकवण्यावर त्यांनी भर दिला. तसेच, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवून, उपलब्ध संधींचे सोने करत स्पर्धा परीक्षा व आव्हानांचा आत्मविश्वासाने सामना करावा आणि उच्च शिक्षणातून स्वतःचा व्यक्तिमत्त्व विकास करावा, असे आवाहन त्यांनी केले.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ज्योती एस. कवळेकर यांनी प्रास्ताविक, वार्षिक अहवालाचे वाचन करून उपस्थितांचे स्वागत केले. प्रा. विनयकुमार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सी. एम. त्यागराज यांनीही यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी नेहमी थोर विचारवंत आणि यशस्वी व्यक्तींशी जोडलेले राहावे, असे सांगून आजचे विद्यार्थी हेच समाजाची खरी संपत्ती असल्याचे प्रा. सी. एम. त्यागराज यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाच्या अध्य्क्षस्थानी केएलई कॉलेज शिक्षण संस्थांच्या कार्यकारी समितीचे कार्याध्यक्ष महांतेश कवटगीमठ हे होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर यशाचे नवनवीन टप्पे गाठावेत, असे प्रतिपादन केले.

या सोहळ्यात बीएससी, बीसीए आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. केएलई संगीत विद्यापीठाच्या प्रा. सविता पाटील आणि सहकाऱ्यांनी राज्यगीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रा. पूजा आणि प्रा. महादेवी सूत्रसंचालन तर डॉ. विजयलक्ष्मी पाटील यांनी आभार मानले.

यावेळी कॉलेजच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य, प्राध्यापक वर्ग, शेकडो विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: