बेळगावमध्ये गाजत असलेल्या ४६०० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. आपण कोणतीही चोरी किंवा फसवणूक केली नसल्याचा दावा करत शशिकांत नीलण्णावर यांनी इन्स्टाग्रामवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये एका वृद्ध महिलेने आणि माजी सैनिकाने नीलण्णावर यांच्या समर्थनार्थ भावना व्यक्त केल्या आहेत.

अब्जावधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप असलेले शशिकांत नीलण्णावर यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही व्हिडिओ अपलोड करण्यात आले असून, यामुळे समाज माध्यमांवर मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये एका वृद्ध महिलेने नीलण्णावर यांच्यावरील आरोप फेटाळत, ते गरिबांना मदत करणारे व्यक्ती असून त्यांच्यावर खोटे आरोप केले जात असल्याचे भावूक होत म्हटले आहे.

त्याच अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भारतीय सैन्यातील निवृत्त सुभेदार नरेंद्रकुमार यांनी शशिकांत नीलण्णावर यांची पाठराखण केली आहे. निवृत्तीनंतर शिवम् असोसिएट्सने आपल्याला सन्मानाने जगण्याची संधी दिली असून, नीलण्णावर यांनी अनेकांना चांगला रोजगार उपलब्ध करून दिल्याची प्रतिक्रिया नरेंद्रकुमार यांनी दिली आहे.
सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून, अशा परिस्थितीत सोशल मीडियावर नीलण्णावर यांच्या समर्थनार्थ व्हायरल झालेले हे व्हिडिओ बेळगावमध्ये आणि राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहेत.


Recent Comments