Belagavi

मुख्यमंत्री बदलाच्या विधानावर लवकरच पडणार पडदा; मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले दिल्लीवारीचे संकेत

Share

राज्य राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांच्या ‘पुढील मुख्यमंत्री परमेश्वर’ या विधानावर काँग्रेस हायकमांड पातळीवर लवकरच पडदा पडणार असल्याचे भाकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी वर्तवले आहे.

बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना बेळगावचे जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, खाजगी भाजीमार्केटच्या व्यापाऱ्यांच्या समस्येबाबत आज बैठक बोलावण्यात आली आहे. आम्ही दोन्ही बाजूंच्या व्यापाऱ्यांशी चर्चा करणार असून आमच्याकडून शक्य ती मदत केली जाईल. मात्र कोणत्याही गोष्टीसाठी कायदा आधी असून कायद्याच्या चौकटीत राहूनच सर्वांना सुविधा करून दिल्या जातील.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, उद्या तुमकुरूमध्ये काँग्रेस नेत्यांची एक महत्त्वाची बैठक आणि मेळावा होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री जाहीरपणे सरकारची आश्वासने आणि त्यांच्या पूर्ततेबाबत माहिती देतील. तसेच पुढील २ वर्षांच्या कालावधीत उर्वरित कामे पूर्ण केली जातील.

माजी मंत्री के. एन. राजण्णा यांच्या ‘पुढील मुख्यमंत्री परमेश्वर व्हावेत’ या विधानावर बोलताना, या मुद्द्यावरून लवकरच दिल्लीतून बोलावणे येणार असून तिथेच या विषयावर चर्चा होऊन या प्रकरणावर लवकरच पडदा पडेल, असा विश्वास मंत्री सतीश जารकीहोळी यांनी व्यक्त केला.

Tags: