Belagavi

रस्त्यावरील खड्डे बुजवणाऱ्या ‘त्या’ दोन वाहतूक पोलिसांचा जाहीर सत्कार

Share

बेळगाव शहरातील श्री शनी मंदिराजवळील रस्त्यावरील धोकादायक खड्डा, कडक उन्हाची तमा न बाळगता स्वतः पुढाकार घेऊन बुजवणाऱ्या दोन वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचा बेळगावचे नागरिक आणि वकील संघटनेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

बेळगाव शहरातील श्री शनी मंदिराजवळ काही विकासकामांसाठी रस्ता खणण्यात आला होता. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतरही हा मोठा खड्डा व्यवस्थित न बुजवल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वाहनधारकांसाठी तो धोकादायक ठरत होता आणि अपघातांना निमंत्रण देत होता. याच ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी तैनात असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी शिवपुत्र हुडेद आणि शिवाप्पा दोड्डभीमप्पागौडर यांनी हा धोका ओळखला. प्रशासनाच्या दिरंगाईची वाट न पाहता, कर्तव्यापलीकडे जाऊन त्यांनी कडक उन्हातच बाजूला पडलेले साहित्य हाती घेतले आणि श्रमदानातून खड्डा बुजवून रस्ता सुरक्षित केला.

खाकी वर्दीतील या दोन्ही कर्मचाऱ्यांची समयसुचकता आणि माणुसकी पाहून बेळगाव शहरातील नागरिक आणि वकील संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) जे. आर. निकम आणि पोलीस निरीक्षक बसणगौडा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला. बेळगाव वकील संघटनेचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब घोरपडे यांनी पोलिसांच्या या कामाचे कौतुक केले.

या प्रसंगी बेळगाव लेबर युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट एन. आर. लातूर, ॲडव्होकेट मोहन नंदी, ॲडव्होकेट चंदू काकडे, ॲडव्होकेट शरद देसाई, ॲडव्होकेट राजेंद्र नलवडे, ॲडव्होकेट विभूती मठ, ॲडव्होकेट महेंद्र कांबळे, राजू सदाशिवसन्नवर, विनायक गोडखिंडी, संजू कामत, ॲडव्होकेट एम. बी. बोंग्रे आणि ॲडव्होकेट गुरुदेव मठपती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: