Belagavi

बेंगळुरूमध्ये काँग्रेस मुख्य कार्यालयातच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

Share

बेंगळुरू मधील काँग्रेस प्रदेश कार्यालयात आज हायड्रामा पाहायला मिळाला. नीट परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पूर्वतयारी बैठकीत युथ काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. कोणतीही नोटीस न देता पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवल्याचा आरोप करत संतप्त कार्यकर्त्यांनी नेत्यांना धारेवर धरल्याची घटना घडली आहे.

बेंगळुरू मधील केपीसीसी कार्यालयात २१ मे रोजी आयोजित नीट गैरव्यवहार विरोधी आंदोलनाच्या पूर्वतयारी बैठकीत युथ काँग्रेस कार्यकर्त्यांमधील अंतर्गत वादामुळे रणकंदन माजले. ही बैठक सुरू असतानाच, कोणतीही पूर्वकल्पना किंवा नोटीस न देता काही पदाधिकाऱ्यांना पदावरून तडकाफडकी मुक्त करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून दोन गटांत जोरदार वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले आणि त्यांच्यात हाणामारी झाली. यावेळी तीव्र संतापलेल्या कार्यकर्त्यांनी केपीवायसीसीचे अध्यक्ष मंजुनाथ गौडा आणि अखिल भारतीय राष्ट्रीय युथ काँग्रेसचे सरचिटणीस निगम भंडारी यांना कोंडीत पकडून थेट घेराव घातला. यामुळे पक्षाच्या कार्यालयात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Tags: