Belagavi

सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावना धुडकावून पालिकेत ठराव आणण्याची तयारी

Share

बेळगाव महानगरपालिकेत कर्नाटकच्या बाजूने ठराव मंजूर करण्यासाठी कन्नड संघटनांनी भाजप नेत्यांवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे बहुमत असलेल्या पालिकेत हा ठराव मंजूर करण्यास कोणतीही अडचण नाही, असे आश्वासन भाजप नेते एन. रविकुमार यांनी दिल्याने सीमाभागात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांचा बेळगाव दौरा रद्द झाल्यामुळे शासकीय विश्रामगृहात आलेल्या कन्नड कार्यकर्त्यांनी भाजप नेते एन. रविकुमार यांची भेट घेतली. बेळगाव महानगरपालिकेत भाजपची सत्ता असल्याने तेथे कर्नाटकच्या बाजूने अधिकृत ठराव मंजूर करण्यात यावा, अशी मागणी या नेत्यांनी निवेदनाद्वारे केली.

सीमाभागातील मराठी भाषिकांचा विरोध डावलून कन्नड संघटनांनी या ठरावासाठी दबाव वाढवला आहे. कन्नड नेत्यांच्या या मागणीला भाजप नेते एन. रविकुमार यांनी तातडीने सकारात्मक प्रतिसाद दिला.

पालिकेत हा ठराव आणण्यास आणि तो मंजूर करण्यास कोणतीही अड़चण नाही, तो निश्चितपणे केला जाईल असे सांगत रविकुमार यांनी कन्नड संघटनांच्या भूमिकेला उघड पाठिंबा दिला आहे. भाजप नेत्याच्या या भूमिकेमुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags: