बड्या व्यक्तींना लग्नाचे आमिष दाखवून आणि नंतर अत्याचाराचे खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवून खंडणी वसूल करणाऱ्या एका टोळीतील महिलेला बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे.


बेळगाव जिल्ह्यात पोलिसांसह अनेक नागरिकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवून ब्लॅकमेल करणाऱ्या रेणमा मुतगा नावाच्या महिलेवर रौडी शिटरची कारवाई करण्यात आली आहे. या महिलेने एका पोलीस निरीक्षकाला लाचखोरीच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला होता, जो फॉरेन्सिक तपासणीत उघड झाला. उपअधीक्षक वीरय्या हिरेमठ यांच्या विशेष पथकाने केलेल्या चौकशीत, या महिलेने २०१२ ते २०२५ दरम्यान विविध पोलीस ठाण्यांत लग्न, फसवणूक आणि बलात्काराचे पाचहून अधिक खोटे गुन्हे दाखल करून लोकांना जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्या माहितीनुसार, या गुन्हेगारी कृत्यांमध्ये ही महिला एकटी नसून तिच्या मागे एका मोठ्या टोळीचा हात आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसह निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या या टोळीला कायदेशीर आणि आर्थिक मदत करणाऱ्या सर्व सूत्रधारांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात सामील असलेल्या सर्व आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


Recent Comments