बेळगावमधील अनगोळ येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित उन्हाळी शिबिराला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या एकदिवसीय शिबिरातून मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच जीवनमूल्यांचे धडे देण्यात आले.


प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाने १० मे रोजी बेळगावमधील अनगोळ येथील बाबले गल्लीमध्ये एकदिवसीय उन्हाळी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.

या शिबिरामध्ये बेळगावमधील चन्नम्मानगर, अनगोळ, भाग्यनगर, गणेशपूर, सांबरा, शहापूर, शास्त्रीनगर, टिळकवाडी, वडगाव, पिरणवाडी आणि यमकनमर्डी अशा विविध भागांतून एकूण ७६ मुला-मुलींनी सहभाग नोंदवला होता. सहभागी विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे खेळ आयोजित करण्यात आले होते. खेळांसोबतच विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांची माहिती देण्यात आली. यावेळी मुला-मुलींनी विविध कलांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. शिबिरात सर्वांना सात्त्विक भोजनाचा लाभ देण्यात आला. तसेच, याच निमित्ताने जागतिक मातृदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित पालकांना ईश्वरीय विश्वविद्यालयाचा संदेश देण्यात आला.
आदरणीय विद्या बेहनजी यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या विविध केंद्रांमधील प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. बीके महेश नायक, बीके मनोहर, बीके शोभा नायक आणि बीके भारती यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.


Recent Comments