बेळगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या करणाऱ्या उत्तर भारतीय टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. शहापूर पोलिसांनी ही मोठी कारवाई करून आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

शहापूर पोलिसांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील आंतरराज्य घरफोड्या करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार मिंटू विश्वास याला अटक केली आहे. चोरीच्या ठिकाणी मिळालेल्या बोटांच्या ठशांच्या आधारे पोलिसांनी या गुन्हेगाराचा शोध लावला. दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने राबवलेल्या या मोहिमेत सुमारे ४४ लाख ८६ हजार रुपये किमतीचे २९४ ग्रॅम सोन्याचे बिस्किट आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

ही टोळी केवळ कर्नाटकच नव्हे तर गोवा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये सक्रिय होती. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाने अत्यंत चाणाक्षपणे आरोपीला ताब्यात घेतले. शहापूर पोलिसांच्या या कामगिरीचे आयुक्तांनी कौतुक केले असून, या अटकेमुळे चोरीचे अनेक जुने गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.


Recent Comments