Belagavi

बेळगाव महापालिकेकडून ‘ऑपरेशन बॅनर’ सुरू

Share

बेळगाव महापालिकेने शहरात ‘ऑपरेशन बॅनर’ मोहीम हाती घेतली असून अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनरवर धडक कारवाई सुरू केली आहे. फूटपाथवरील अतिक्रमणे हटवल्यानंतर आता महापालिकेने आपला मोर्चा विनापरवाना फलकांकडे वळवला आहे.

बेळगाव महापालिका प्रशासनाने शहरात स्वच्छता आणि सुसूत्रता आणण्यासाठी कंबर कसली आहे. महापालिकेच्या अभियंत्या लक्ष्मी निप्पाणीकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवरील मुदत संपलेले तसेच अनधिकृतपणे लावलेले बॅनर हटवण्याची मोहीम राबवली.

शहराचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या राणी चन्नम्मा चौक, डॉ. बी. आर. आंबेडकर मार्ग, क्लब रोड आणि कोल्हापूर चौक यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणांवर विविध संघटनांनी लावलेले अनधिकृत फलक या कारवाईत जप्त करण्यात आले. महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे शहराच्या मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असून, ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अनेक दिवसांपासून शहरात अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग्जचा सुळसुळाट झाला होता, ज्यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत होती. महापालिकेच्या या सक्रिय भूमिकेचे आणि ‘ऑपरेशन बॅनर’चे बेळगावमधील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. शहराला विद्रुपीकरणापासून वाचवण्यासाठी अशा कठोर कारवाईची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Tags: