बागलकोट जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे तलाव आणि विहिरी कोरड्या पडू लागल्या असून, तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील सुमारे ११४ गावांमध्ये मे अखेरपर्यंत पाण्याची समस्या उद्भवणार असल्याचे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.


बागलकोटमध्ये उन्हाचा पारा वाढल्याने पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासनाने दोन महत्त्वाच्या बैठका घेतल्या आहेत. एप्रिल महिन्यात ५२ आणि मे महिन्यात ६२ अशा एकूण ११४ गावांमध्ये पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी संगप्पा यांनी सांगितले. ही गावे आधीच चिन्हांकित करण्यात आली असून खबरदारी म्हणून खाजगी कूपनलिका भाड्याने घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सध्या इळकल आणि गुळेदगुड्ड मधील प्रत्येकी एका गावात खाजगी कूपनलिकांद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

पाण्याची अडचण दूर करण्यासाठी नद्यांमध्ये पाणी सोडले जात असून २ एप्रिल रोजी घटप्रभा नदीत १.१० टीएमसी आणि १० एप्रिल रोजी मलप्रभा नदीत १ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. हिप्परगी बॅरेजमध्ये सध्या १.४८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून मे अखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या उद्भवणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी संगप्पा यांनी दिली आहे. नागरिकांनी पाण्याचा थेंब न थेंब वाचवून प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती जिल्हाधिकारी संगप्पा यांनी केली आहे.


Recent Comments