बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावामध्ये 43 वर्षानंतर भरलेल्या ग्रामदेवतेच्या यात्रेनिमित्त भाविकांचा महापूर लोटला असून श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव आज असंख्य भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.


सुमारे ४३ वर्षांनंतर बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावामध्ये ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. मंगळवारी अक्षतारोपण झाल्यानंतर आज बुधवारी सकाळी देवीच्या भव्य रथोत्सवास सुरुवात झाली.


भंडाऱ्याची उधळण आणि श्री महालक्ष्मीच्या जयघोषात हजारो भक्तांनी देवीचा रथ ओढला. श्री गणेश आणि श्री कलमेश्वर मंदिरातून या रथोत्सवास सुरुवात झाली असून हा रथ सायंकाळपर्यंत संपूर्ण गावातून फिरणार आहे. यावेळी भाविकांनी रथावर खारीक, खोबरे आणि केळी उधळून रथोत्सवात सहभाग घेतला.

गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामस्थ या यात्रेची पूर्वतयारी करत होते. सुख-शांती आणि समृद्धीची प्रार्थना करत गेल्या 43 वर्षानंतर आज पुन्हा या सोहळ्यात सहभागी होऊन ग्रामस्थांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

ग्रामदेवतेची यात्रा अत्यंत उत्साहात साजरी होत असून ग्रामस्थ, पंच कमिटी आणि ग्रामपंचायतीचे यात मोलाचे सहकार्य लाभले आहे. या भागाच्या आमदार तथा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचेही सहकार्य लाभले असून नऊ दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम चालणार असल्याचे यल्लोजी पाटील यांनी सांगितले.
आज झालेल्या या भव्य रथोत्सवात हजारो भाविक सहभागी झाले होते.आजच्या रथोत्सवानंतर श्री लक्ष्मीची मूर्ती गदगेवर विराजमान होणार असून पुढील 7 दिवस हि यात्रा विविध धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमातून साजरी होणार आहे.


Recent Comments