माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेन्द्र यांच्यावर आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी कडाडून टीका केली आहे. येडियुरप्पा आपल्या मुलाच्या फायद्यासाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव तंत्र वापरत असून, आपण लवकरच स्वतंत्र राजकीय वाटचाल करणार असल्याचे यत्नाळ यांनी स्पष्ट केले.

माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाचा गौरव करण्यासाठी ९ मे रोजी चित्रदुर्ग येथे ‘अभिमानोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या भूमीपूजनाला बी.वाय. विजयेन्द्र उपस्थित होते. यावरून निशाणा साधताना, वडिलांच्या उत्सवासाठी मुलानेच पूजा केली, यांना दुसरा कोणताही प्रामाणिक कार्यकर्ता मिळाला नाही का, असा सवाल बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केला.

बी.वाय. विजयेन्द्र यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवले नाही किंवा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार केले नाही, तर लिंगायत समाज भाजपची साथ सोडेल, असा संदेश येडियुरप्पा हायकमांडला देत आहेत. आपल्या मुलाला पदे मिळवून देण्यासाठी येडियुरप्पा हायकमांडला ब्लॅकमेल करत असून, पद न दिल्यास कर्नाटकात भाजप संपवण्याची धमकी दिली जात आहे, असा आरोप बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केला.
मी स्वतः सायकलवरून फिरून पक्ष बांधला आहे, मात्र आता मी नवीन पक्ष काढण्याच्या भीतीने भाजप नेत्यांना घाम फुटला आहे. मला फोन करून पक्ष न काढण्याची विनंती केली जात आहे, असे बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी नमूद केले. मे महिन्यात उन्हाचा कडाका कमी झाल्यानंतर दावणगेरे किंवा चित्रदुर्ग येथे भव्य हिंदू मेळावा घेऊन नव्या पक्षाची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी दिली.


Recent Comments