Belagavi

हिरेबागेवाडीमध्ये उरुस उत्साहात

Share

बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडीमध्ये हजरत पीर महंमद गौस शाह कादरी यांचा उरुस आणि संदल उत्सव उत्साहात पार पडला. सामाजिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या या उत्सवात आयोजित जंगी कुस्ती स्पर्धेने कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

हिरेबागेवाडीमध्ये हजरत पीर महंमद गौस शाह कादरी यांचा उरुस आणि संदल सोहळा परंपरेनुसार साजरा झाला. धार्मिक विधींनी सुरू झालेला हा सोहळा जात-धर्म बाजूला ठेवून एकता आणि सलोख्याचा संदेश देणारा ठरला. बड्डेकोळ मठाचे नागेंद्र आज्जा आणि दर्गा आज्जा यांच्या सानिध्यात पार पडलेल्या या उत्सवासाठी हजारो भक्त उपस्थित होते.

उरुसानिमित्त कुस्ती, मनोरंजन आणि सांस्कृतिक नाटकांचे आयोजन करण्यात आले होते. आखाड्यात २५ जोड्यांमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतींनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मुख्य जंगी कुस्तीत नेपाळचा देवा थापा आणि हिमाचलचा सोनू कुमार आमनेसामने आले होते. चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात देवा थापाने विजय मिळवून प्रेक्षकांची दाद मिळवली.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले चन्नराज हट्टीहोळी यांनी कुस्ती खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजन समितीला २ लाख रुपयांची देणगी दिली. अशा धार्मिक आणि क्रीडा कार्यक्रमांमुळे स्थानिक पातळीवर भाईचारा आणि खिलाडूवृत्ती वाढण्यास मदत होते, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Tags: