बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी येथे गरिबांच्या हक्काचा रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विकण्याचा डाव प्रशासनाने उधळून लावला आहे. तहासिलदार अनिल बडिगेर यांनी एका घरावर छापा टाकून सुमारे ४० पोती तांदूळ जप्त केला असून तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी शहरात असलेल्या आयेशा कॉलनीमधील एका घरात अवैधरित्या रेशनचा तांदूळ साठवून ठेवल्याची खात्रीशीर माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे जमखंडीचे तहासिलदार अनिल बडिगेर आणि अन्न विभागाच्या पथकाने तातडीने संबंधित घरावर धाड टाकली. या कारवाईत अन्नभाग्य योजनेचा सुमारे ४० पोती साठा पथकाच्या हाती लागला आहे.
कारवाई दरम्यान तस्करांनी प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी लढवलेली शक्कल पाहून अधिकारीही चकित झाले. रेशनचा हा तांदूळ लपवण्यासाठी तो खताच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये भरून ठेवण्यात आला होता. वरून पाहिल्यास ही रासायनिक खताची पोती वाटत होती, मात्र त्याची तपासणी केली असता त्यामध्ये रेशनचा तांदूळ असल्याचे उघड झाले. हा सर्व साठा सध्या महसूल विभागाने जप्त केला आहे.
हा अवैध साठा नेमका कोणाचा आहे आणि तो कोठे पाठवला जाणार होता, याचा तपास आता यंत्रणेमार्फत केला जात आहे. जमखंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई पार पडली असून पोलीस आणि अन्न विभाग या प्रकरणाचा संयुक्त तपास करत आहेत. सरकारी तांदळाचा अपहार करणाऱ्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अनिल बडिगेर यांनी सांगितले.


Recent Comments