Belagavi

बेळगावमधील कमल बसदीत पाच दिवसीय धर्मचक्र आराधना महोत्सवास प्रारंभ

Share

बेळगावमधील ऐतिहासिक किल्ल्याच्या आवारात असलेल्या कमल बसदीमध्ये आजपासून पाच दिवसीय ‘धर्मचक्र आराधना महोत्सवा’ला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी विविध धार्मिक विधी पार पडले असून भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.

महोत्सव समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या धार्मिक सोहळ्याचे उद्घाटन आमदार अभय पाटील, माजी आमदार वीरकुमार पाटील, उद्योजक उत्तम पाटील, अभिनंदन पाटील आणि विधिज्ञ रविराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आचार्य धर्मसेन मुनींच्या सानिध्यात जागतिक शांततेसाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून २८ एप्रिलपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतील.

बेळगाव हे सर्वधर्मांचे केंद्र असून जैन धर्माची ही ऐतिहासिक परंपरा जतन करण्याच्या दृष्टीने ही आराधना महत्त्वाची असल्याचे आयोजकांनी सांगितले. आगामी काळात मंत्री सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, खासदार जगदीश शेट्टर आणि प्रभाकर कोरे यांसह अनेक मान्यवर या महोत्सवास भेट देणार आहेत. २६ एप्रिल रोजी ५०० मुलांचा मुंज सोहळा आणि २७ एप्रिल रोजी भव्य रथोत्सव पार पडणार आहे.

सरकारच्या वतीने कमल बसदीच्या विकासासाठी २.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, हंपीच्या धर्तीवर येथे ‘लाईट अँड साऊंड’ शोची व्यवस्था लवकरच केली जाईल, अशी माहिती सुनील हनमण्णाावर यांनी दिली. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी हिराचंद कलमनी, विनोद दोड्डण्णाावर, सन्मती कस्तुरी आणि इतर पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

Tags: