Belagavi

बेळगावमध्ये ‘नटसार्वभौम’ डॉ. राजकुमार यांची जयंती साजरी

Share

डॉ. राजकुमार हे केवळ एक अभिनेते नसून ते कर्नाटक संस्कृतीचे राजदूत होते. त्यांच्यातील कलात्मक बांधिलकी आणि नवरसांचे ज्ञान अफाट होते, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक डी. एस. चौगुले यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

बेळगाव जिल्हा प्रशासन आणि माहिती व जनसंपर्क विभागाच्या संयुक्त विद्यमाने आज वार्ता भवन येथे डॉ. राजकुमार यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बेळगाव महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम., माहिती विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर आणि ज्येष्ठ नाटककार डी. एस. चौगुले यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉ. राज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

यावेळी बोलताना डी. एस. चौगुले म्हणाले की, अभिनयात नवरसांचे सादरीकरण करणे सोपे नसते, त्यासाठी प्रचंड बांधिलकी लागते आणि ती डॉ. राजकुमार यांच्यात ठासून भरली होती. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबातून आलेल्या डॉ. राजकुमार यांचे शिक्षण कमी झाले असले, तरी त्यांची कामगिरी असामान्य होती. त्यांचे बोलणे मधाहूनही गोड होते आणि सर्वांचा सन्मान करणे हा त्यांचा स्वभाव होता.

या कार्यक्रमात कलाकारांनी डॉ. राजकुमार यांच्या चित्रपटांतील लोकप्रिय गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याला अनेक शासकीय अधिकारी, मान्यवर आणि डॉ. राजकुमार यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: