Belagavi

बेळगाव पोलिसांच्या कारवाईत पाच घरफोड्यांना अटक

Share

बेळगाव शहरात घरफोडी करून दहशत निर्माण करणाऱ्या पाच अट्टल चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ६७ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस आयुक्त भूषण बोरासे म्हणाले की, अमन नगर, उज्ज्वल नगर, मारुती नगर, शाहू नगर आणि वीरभद्र नगर परिसरात घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलीस उपआयुक्तांनी (DCP Crime) विशेष पथक तयार केले होते.

या पथकाने कारवाई करत रिहान दफेदार, मल्लिक हुबळी, अरमान शेख, खलील हुबळी आणि शाहनवाज पठाण या पाच जणांना अटक केली आहे. आरोपींकडून ४१५ ग्रॅम सोने आणि १ किलो ३२९ ग्रॅम वजनाचे इतर दागिने असा एकूण ६७.०९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे एकूण ११ गुन्ह्यांचा उलगडा झाला असल्याचे भूषण बोरासे यांनी सांगितले.

शहरातील घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ‘लॉक हाऊस बीट सिस्टम’ कार्यान्वित केली आहे. नागरिक जेव्हा घराला कुलूप लावून बाहेरगावी जातात, तेव्हा त्यांनी या प्रणालीचा लाभ घ्यावा. आतापर्यंत सुमारे २२० नागरिकांनी याची नोंदणी केली असून त्यांच्या घरांवर पोलीस विशेष लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

या कठीण तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करत पोलीस आयुक्तांनी त्यांना रोख बक्षीस जाहीर केले आहे. नागरिकांनी सतर्क राहून प्रवासाला जाताना पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून मालमत्तेचे संरक्षण करणे सोपे होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Tags: