Vijayapura

विजापुरात उद्योजकाच्या हत्येचा छडा; सहा सराईत मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

Share

विजापूरमध्ये रिअल इस्टेट उद्योजक राजू खैरे यांची फिल्मी स्टाईलने हत्या करणाऱ्या सहा आरोपींना पोलिसांनी २४ तासांत बेड्या ठोकल्या असून, मालमत्तेच्या वादातून हा कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे.

विजापूर शहराबाहेर अलियाबाद येथे मंगळवारी दुपारी रिअल इस्टेट उद्योजक राजू बापू खैरे यांची हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांनी प्रथम त्यांच्या थार गाडीला टिप्परने धडक दिली आणि त्यानंतर गाडीवर बेछूट गोळीबार केला. गाडीचा दरवाजा उघडत नसल्याने आरोपींनी दगडाने ठेचून राजू खैरे यांचा खून केला होता.

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी दोन विशेष पथके तैनात केली होती. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अबूश्या कोडलेकर, आबाश्या माने, वागीश पोळ, जालिंदर हक्के, खंडूबा तांबे आणि मरगु हक्के या सहा जणांना विविध ठिकाणांहून ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपींकडून दोन बेकायदेशीर देशी पिस्तुलं, सात मोबाईल, हत्येसाठी वापरलेली दोन दुचाकी, एक कार आणि टिप्पर जप्त केला आहे. राजू खैरे हे द्राक्ष बागायतदार होते आणि त्यांच्या कुटुंबात जुना मालमत्तेचा वाद सुरू होता, अशी माहिती पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.

कमी वेळेत आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असले, तरी या घटनेत वापरल्या गेलेल्या बेकायदेशीर शस्त्रांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विजापुरातील बेकायदेशीर शस्त्रसाठ्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज आता व्यक्त होत आहे.

Tags: