Belagavi

बेळगावमध्ये डीएलएड परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांभोव्ही जमावबंदी लागू

Share

बेळगाव शहरात होणारी डीएलएडची पूरक परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात जमावबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

२७ एप्रिल ते ४ मे या कालावधीत डीएलएड प्रथम आणि द्वितीय वर्षाची पूरक परीक्षा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मन्नूरमधील जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) परीक्षा केंद्राभोवती भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या काळात केंद्राच्या परिसरात सार्वजनिकरीत्या एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे.

या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने, सायबर कॅफे आणि इंटरनेट केंद्रे परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवावी लागणार आहेत. अधिकृत कर्मचारी आणि परीक्षार्थींशिवाय कोणालाही केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच परिसरात ध्वनिवर्धक वापरणे किंवा घोषणाबाजी करण्यास बंदी असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले आहे.

Tags: