बेळगावमधील ऐतिहासिक श्री शिवजयंती उत्सव आणि वडगाव येथील चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पाडल्याबद्दल शहरवासीय व नगरसेवकांतर्फे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांचा सत्कार करण्यात आला.


नगरसेवक रवी साळुंके आणि माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांच्या नेतृत्वाखालील शिवजयंती उत्सव मंडळाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात जाऊन पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांना मानाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. शांतता राखण्यासाठी पोलिसांनी दाखवलेल्या कौशल्याबद्दल मंडळाने समाधान व्यक्त केले.
यानंतर शिष्टमंडळाने कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांचाही सत्कार केला. यंदाची तब्बल १३ तास चाललेली मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने महिनाभरापासून बैठका घेऊन जनजागृती केली होती, ज्याचा सकारात्मक परिणाम मिरवणुकीत दिसून आला, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
गेल्या १०७ वर्षांच्या परंपरेप्रमाणे यंदाही शिवजयंती मिरवणूक उत्साहात आणि शांततेत पार पडली असून यासाठी पोलीस, महानगरपालिका आणि सर्व सरकारी विभागांचे उत्तम सहकार्य लाभल्याचे नगरसेवक रवी साळुंके यांनी म्हटले.
यंदा प्रथमच डॉल्बीमुक्त शिवजयंती झाल्यामुळे मिरवणुकीत मोठा बदल जाणवला असून कोणताही अनुचित प्रकार न घडता मिरवणूक सुरळीत पार पडली. मंडळांना शिस्त लावण्याचे काम पोलीस आयुक्तांनी अत्यंत कौशल्याने केले, अशी प्रतिक्रिया मनोहर हलगेकर यांनी दिली. या प्रसंगी राजू सावंत, अनंत बिर्जे, जोतिबा शहापूरकर, प्रसाद मुतगेकर यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments