Belagavi

सुळेभावीमध्ये पारंपारिक बैलगाडीतून शिवजन्मोत्सव सोहळा

Share

बेळगाव तालुक्यातील प्रसिद्ध क्षेत्र सुळेभावीमध्ये यंदाही शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. गेल्या सात दशकांपासून चालत आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेनुसार, बैलगाडीतून छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढून शिवभक्तांनी आपली अढळ निष्ठा व्यक्त केली.

बेळगाव तालुक्यातील शक्तीदेवता श्री महालक्ष्मीचे पुण्यक्षेत्र असलेल्या सुळेभावीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळा युवक मंडळाच्या वतीने गेल्या ६० ते ७० वर्षांच्या प्रदीर्घ परंपरेनुसार शिवजयंती सोहळा अत्यंत वैभवात साजरा करण्यात आला. पारंपारिक बैलगाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवून निघालेली ही मिरवणूक लक्ष्मी गल्लीतून सुरू झाली.

ही मिरवणूक कल्मेश्वर मंदिर, महालक्ष्मी मंदिर आणि रेणुका मंदिर यांसह गावातील प्रमुख गल्ल्यांमधून मार्गस्थ झाली. यावेळी संपूर्ण सुळेभावी गाव भगवेमय झाले होते. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अनिल मुरारी, विलास मोळगी, नागेश चौगुले, देवराज कुकडोळ्ळी, विश्वनाथ पाटील, किरण बडकी, लक्ष्मण गौडप्पगोळ, बसवाणी मुरारी, देवानंद हुंकरीपाटील, लक्ष्मण मुरारी, सिद्राय हुंकरीपाटील यांसह इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Tags: