सांस्कृतिक नायक विश्वगुरू बसवण्णा यांच्या जयंतीनिमित्त बेळगाव शहरात जागतिक लिंगायत महासभेच्या नेतृत्वाखाली रविवार, दि २६ एप्रिल रोजी शहरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती महासभेचे अध्यक्ष बसवराज रोट्टी यांनी दिली.

बसवण्णा यांच्या ८९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली दुचाकी रॅली यशस्वी झाल्यानंतर आता मुख्य सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजता राणी चन्नम्मा चौकातून जगज्योती बसवेश्वरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येईल. या मिरवणुकीत विविध मठांचे स्वामीजी उपस्थित राहणार असून बेळगाव शहर आणि तालुक्यातील लोकप्रतिनिधींसह सुमारे ४० ते ५० हजार बसवप्रेमी सहभागी होतील, अशी माहिती बसवराज रोट्टी यांनी दिली.

ही मिरवणूक काकती वेस, शनिवार खुट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली आणि कॉलेज रोडमार्गे मार्गक्रमण करत लिंगराज कॉलेज मैदानावर विसर्जित होईल. मिरवणुकीच्या समारोपानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, त्यानंतर विशेष लेझर शो आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी विविध बसव संघटनांचे सदस्य परिश्रम घेत आहेत. यावेळी पत्रकार परिषदेला शंकर गुडस, अशोक मळगली, मुरुगेंद्रगौडा पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments