Belagavi

बेळगावच्या स्केटर्सची सुवर्णभरारी; सांगली आणि कैगा स्पर्धेत पदकांची लयलूट

Share

बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्रातील सांगली आणि कारवारमधील कैगा येथे आयोजित राज्य आणि आंतरराज्यीय स्तरावरील स्केटिंग स्पर्धेत बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.

सांगली आणि कैगा येथे झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये ३०० हून अधिक निष्णात स्केटर्सनी सहभाग घेतला होता. या तीव्र स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी ६ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य अशा एकूण १२ पदकांवर आपले नाव कोरले. सांगलीतील स्पर्धेत जान्हवी तेंडुलकर, सौरभ साळोखे, शल्य तरळेकर आणि प्राणिका मोटेकर यांनी प्रत्येकी एक सुवर्ण पदक जिंकले, तर अमिषा वेर्णेकर आणि अर्शन मडीवाळ्ळे यांनी रौप्य पदक पटकावले. तसेच कैगा येथील स्पर्धेत श्रेयस वजंत्री याने २ सुवर्ण, सार्थक मर्दोळकर याने १ सुवर्ण, सोहम वाघमारे याने २ कांस्य आणि रचित नांगरे याने १ पदक जिंकून यश संपादन केले.

हे सर्व खेळाडू प्रशिक्षक सूर्यकांत हिंदळगेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केएलई आणि गुड शेफर्ड रिंकमध्ये सराव करत होते. या खेळाडूंच्या यशाबद्दल डॉ. प्रभाकर कोरे आणि इतर मान्यवरांनी आनंद व्यक्त केला आहे.

Tags: