आयटी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या बेळगावमधील तरुण पिढीचे स्वप्न आता स्वतःच्या शहरातच पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली ‘टीआयसी’ कंपनी आता बेळगावमध्ये दाखल झाली असून, यामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


बेळगावमधील बॉक्साईट रोड, राजीव गांधीनगर येथे ‘ट्रस्टेड, इनोव्हेटिव्ह, कमिटेड’ म्हणजेच टीआयसी या नामांकित कंपनीने आपले कार्य सुरू केले आहे. बुधवारी संध्याकाळी बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते या कंपनीच्या नवीन शाखेचे लोकार्पण करण्यात आले.


टीआयसी कंपनीने बेळगावमध्ये कामकाज सुरू करून तरुण पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही कौतुकास्पद बाब आहे. पूर्वी बेळगावमधील तरुणांना आयटी क्षेत्रातील नोकरीसाठी परदेशात किंवा इतर मोठ्या शहरांत जावे लागत असे. मात्र, आता कुटुंबापासून दूर न जाता आपल्याच शहरात राहून आयटी कंपनीत काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, जी बेळगावच्या विकासासाठी पूरक ठरेल, असे आसिफ सेठ यांनी म्हटले.
आमचे पाच वर्षांचे नियोजन यशस्वी झाले असून यूएई, कतार आणि मलेशियानंतर आम्ही आता बेळगावात आलो आहोत. कौशल्यप्राप्त तरुणांना संधी देण्यासाठी आम्ही येथे पाऊल ठेवले असून, पदवीधर तरुणांनी जागतिक स्तरावर करिअर घडवण्यासाठी टीआयसीमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन अली खान आणि सईदा यांनी केले.
मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर गेल्या एक वर्षापासून येथे काम करत असलेल्या ज्योती यांनी सांगितले की, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांना येथे अत्यंत दर्जेदार अनुभव मिळत असल्याचे ज्योती यांनी म्हटले.
मराठा मंडळमध्ये पदवीचे शिक्षण घेत असतानाच टीआयसी कंपनीने आमच्याशी संपर्क साधला होता. या कंपनीत निवड होणे हे आमचे भाग्य असून येथे कॉर्पोरेट कामाचा अनुभव घेण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे धैर्यशील देसाई यांनी म्हटले.
कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण झाल्यावर टीआयसीमध्ये निवड झाल्यामुळे विविध प्रकारचे अनुभव मिळत आहेत. आयटी कंपनीत करिअर करण्याचे आमचे ध्येय पूर्ण झाले असून स्वतःच्या शहरात कुटुंबासोबत राहून ही संधी मिळत असल्याचा आनंद भावना पाटील यांनी व्यक्त केला.
याप्रसमी समीर अली, गगनदीप सिंग, आदिल अली खान, आशिष शर्मा, साक्षी सक्सेना, आसिफ इक्बाल, मोहम्मद अल्ताफ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments