बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका प्रशासनाने शनिवारी ‘ऑपरेशन स्ट्रीट डॉग’ मोहिमेला सुरुवात केली.


या मोहिमेअंतर्गत शहरातील शेट्टी गल्ली परिसरात महापालिका कर्मचारी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई केली. यावेळी परिसरात उच्छाद मांडणाऱ्या आणि हिंसक झालेल्या कुत्र्यांना पकडण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात आली.

शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांवर अचानक होणाऱ्या या हल्ल्यांमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. यामुळे सकाळ-संध्याकाळ घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, याबाबत पालिकेकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या.
नागरिकांचा वाढता रोष आणि सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने आता ही मोहीम तीव्र केली आहे. आगामी काळात शहरातील सर्वच भागांत हंत्याहंत्याने ही कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कुत्र्यांना पकडण्यासोबतच त्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी लसीकरण आणि नसबंदीवरही भर दिला जाणार आहे.
महानगरपालिकेच्या या तत्पर कारवाईमुळे शेट्टी गल्लीतील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. ही मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता सातत्याने सुरू ठेवावी, अशी मागणी बेळगावमधील नागरिकांकडून केली जात आहे.


Recent Comments