Belagavi

पेन्शनवाढीच्या मुद्द्यावरून बेळगावात दिव्यांगांचे आंदोलन

Share

राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात दिव्यांगांनी पेन्शनवाढीसाठी रणशिंग फुंकले आहे. मासिक मानधनात वाढ करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जोरदार निदर्शने करण्यात आली.

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दिव्यांगांनी सरकारला मागण्यांचे निवेदन सादर केले. उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिव्यांगांचे मासिक मानधन ६ हजार रुपयांपर्यंत वाढवावे, ही आमची मुख्य मागणी आहे. याशिवाय ‘शक्ती’ योजनेत विशेष सवलत, स्वतंत्र बीपीएल कार्ड आणि राखीव निधीतून ‘दिव्यांग भवन’ उभारावे. दिव्यांगांचे प्रश्न मांडण्यासाठी विधिमंडळात एका आमदारकीची तरतूद करावी, अशी मागणी यल्लाप्पा बांदीवडेकर यांनी केली आहे.

कर्नाटकात दिव्यांग घटक सर्वाधिक दुर्लक्षित असून आम्हाला केवळ सहानुभूती नको, तर समाजात समान संधी हवी आहे. निवडणुकांमध्ये मतदानासाठी आमचा वापर केला जातो, मात्र प्रत्यक्ष सुविधा देताना सरकार नेहमीच टाळाटाळ करते. पंतप्रधान मोदी आम्हाला ‘देवाघरची मुले’ म्हणतात, मग आम्हालाही अनुसूचित जाती-जमातींप्रमाणे विशेष सवलती का मिळत नाहीत, अशी प्रतिक्रिया महांतेश होंगल यांनी दिली.

Tags: