Belagavi

अपघातातील जखमींच्या मदतीला धावले माजी महापौर

Share

बेळगावच्या पिरनवाडी येथे झालेल्या अपघातातील जखमींच्या मदतीला माजी महापौर विजय मोरे धावून आले. खासगी रुग्णालयाने उपचार नाकारल्यानंतर त्यांनी तातडीने जखमींना सिव्हिल रुग्णालयात दाखल केले.

बेळगावच्या पिरनवाडीजवळ झालेल्या रस्ते अपघातात दोन जण गंभीर जखमी होऊन मृत्यूशी झुंज देत होते. ही माहिती मिळताच माजी महापौर विजय मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने उद्यमबाग येथील एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, आपत्कालीन स्थितीत उपचार करण्याऐजी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांच्या पूर्ततेला प्राधान्य दिले. रुग्णालयाच्या या भूमिकेमुळे उपस्थित नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

खासगी रुग्णालयाकडून होणारा विलंब पाहून विजय मोरे यांनी स्वतःच्या वाहनातून जखमींना तातडीने बेळगावच्या सिव्हिल रुग्णालयात हलवले. सामाजिक कार्यकर्ते नीलेश गावडे आणि स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू झाले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नियमांपेक्षा माणुसकी महत्त्वाची असल्याचे विजय मोरे यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले असून त्यांच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: