भरदिवसा पिस्तूलचा धाक दाखवून गोळीबार करत करण्यात आलेल्या दरोड्याचा विजापूर पोलिसांनी छडा लावला आहे. पोलीस खबऱ्या म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने कर्जाचा डोंगर फेडण्यासाठी हा दरोडा टाकल्याचे तपासात उघड झाले आहे.


विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील हलसंगी येथे २६ जानेवारी रोजी ‘भूमिका ज्वेलर्स’वर धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी दुकानदार महारीद्र कुंचगार यांना पिस्तूलचा धाक दाखवून २०५ ग्रॅम सोने आणि एक किलो चांदी लुटली होती. याप्रकरणी पोलिसांनी हणमंत मल्लाप्पा वाघोली (२८) आणि शिवराज ऊर्फ गौडप्पा न्हावी (२८) या दोघांना अटक केली आहे.


हणमंत वाघोली हा मूळचा जत (महाराष्ट्र) येथील असून सध्या पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात राहत होता. तो स्वतः पोलीस होण्याचे स्वप्न पाहत होता आणि पोलिसांचा खबऱ्या म्हणूनही काम करत असे. इतकेच नव्हे तर, तो अनेक तरुणांना पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षणही देत होता. मात्र, विलासी जीवनशैली आणि डोक्यावर झालेल्या कर्जामुळे तो गुन्हेगारीच्या वाटेवर वळाला.
“आरोपींकडून २२ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, ३ गावठी पिस्तूल, २६ जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे,” अशी माहिती विजापूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.
हे आरोपी यापूर्वी सोलापूर आणि धुळखेड परिसरातही दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. मात्र, तिथे गर्दी असल्याने त्यांनी हलसंगी येथील दुकानाला लक्ष्य केले. या दरोड्यासाठी त्यांनी गोरखपूर येथून गावठी पिस्तूल मागवले होते. पोलीस खबऱ्या म्हणून वावरणाऱ्या हणमंतला आता स्वतःच्याच कृत्यामुळे तुरुंगाची हवा खावी लागत आहे.


Recent Comments