Belagavi

बेळगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तिघांना तीन वर्षे सक्तमजुरी

Share

बेळगावमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढून तिचा विनयभंग करणाऱ्या तीन नराधमांना विशेष पॉक्सो न्यायालयाने कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात न्यायालयाने तिन्ही आरोपींना प्रत्येकी तीन वर्षे तुरुंगवास आणि पीडितेला आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले आहेत.

बेळगावातील भारत नगर येथील सचिन सहाने, बिबीसर प्रसाद सहाने आणि शुभम यादव या तिघांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०२४ मध्ये दुकानात जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून या नराधमांनी तिची छेड काढली होती. याप्रकरणी बेळगावच्या एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक एस. आर. मुत्तत्ती यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते, अशी माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाची सविस्तर सुनावणी बेळगावच्या विशेष पॉक्सो न्यायालयात पार पडली. न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी पुराव्यांच्या आधारे तिन्ही आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पीडित मुलीला १ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे निर्देश न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी दिले आहेत. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता एल. व्ही. पाटील यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला.

Tags: