विजापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग ५० वर असलेल्या एका कार सर्व्हिस सेंटरला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या आगीत सर्व्हिसिंगसाठी आलेल्या २० हून अधिक कार जळून खाक झाल्या असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
विजापूर येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या हनुमंत कनमडी यांच्या मालकीच्या ‘एचएमके’ कार सर्व्हिस सेंटरमध्ये ही आग लागली. दुरुस्ती आणि सर्व्हिसिंगसाठी आलेल्या विविध कंपन्यांच्या महागड्या गाड्यांनी काही वेळातच पेट घेतला. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, संपूर्ण सर्व्हिस सेंटर जळून खाक झाले असून परिसरात धुराचे लोट पसरले होते. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सुदैवाने, आग लागली तेव्हा सर्व्हिस सेंटरमध्ये कोणीही नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीचा वेढा आजूबाजूच्या परिसरात पसरू नये म्हणून जवानांनी तत्परतेने पावले उचलल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या दुर्घटनेत सर्व्हिस सेंटरमधील सुमारे ३५ लाख रुपयांचे सुटे भाग (स्पेयर पार्ट्स) जळून खाक झाले असून, १ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या गाड्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी गोलघुमट आणि विजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. गोलघुमट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.


Recent Comments