Chikkodi

एकसंबा येथे भव्य ‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात संपन्न

Share

मातृशक्तीने नटलेल्या आपल्या भारत देशाला आपण भारतमाता म्हणून गौरवतो. अशा आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन करणे, देशाचा मान राखणे आणि राष्ट्राचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन आत्मनिर्भर भारतचे जिल्हा प्रवक्ते नंदू गायकवाड यांनी केले.

चिक्कोडी ग्रामीण भागाच्या वतीने रविवारी एकसंबा शहरात आयोजित ‘विराट हिंदू संमेलना’त मुख्य वक्ते म्हणून नंदू गायकवाड बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठत्वावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे नेतृत्व करणाऱ्या निपाणीच्या भाजप आमदार शशिकला जोल्ले यांनी प्रास्ताविकात म्हटले की, भारतीय संस्कृती जगासाठी आदर्श असून आपल्या माता-भगिनींकडून या संस्कृतीचे रक्षण होत आहे. आरएसएस संघाने उभा केलेला भारत अंतर्गत आणि बाह्य शक्तींपासून सुरक्षित ठेवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी जीवनशैली आणि नागरी शिष्टाचार या पाच विषयांचा अंगीकार प्रत्येकाने करावा, असे आवाहन शशिकला जोल्ले यांनी केले.

याप्रसंगी विश्व हिंदू परिषद गोकाक प्रांताचे सत्संग प्रमुख नारायण मठाधिकारी आणि चिक्कोडीच्या सामाजिक कार्यकर्त्या नीलम संजय अडके यांची भाषणे झाली. संमेलनाला मंगसुळी गिरी आश्रमाचे श्री राजयोगी नागलिंग महास्वामीजी, हुक्केरी कॅरगुड्डमठचे श्री अभिनव मंजूनाथ महाराज आणि निपाणी समाधीमठचे श्री प्राणलिंग महास्वामीजी यांचे दिव्य सान्निध्य लाभले.

संमेलनानिमित्त विविध वाद्यवृंद आणि महिलांच्या कुंभमेळ्यासह भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शिवशंकर जोल्ले हायस्कूलच्या मैदानापासून सुरू झालेली ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून श्री बीरेश्वर मंदिराच्या आवारापर्यंत पोहोचली. प्रारंभी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले आणि नीलम अडके यांच्या हस्ते गोपूजन करून शोभायात्रेचा शुभारंभ झाला.

या सोहळ्याला माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, ज्योतीप्रसाद जोल्ले, दुंडाप्पा बेंडवाडे, संजीव पाटील, महेश बाकळे, भालचंद्र बाकळे, सुनील कामत, दिलीप देसाई, विनोद शहा, कुमार कुंभार, उत्तम काटकर, शिवराज जोल्ले यांच्यासह पंचक्रोशीतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: