Vijayapura

मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या स्वागतासाठी विजापूर नगरी सज्ज

Share

विजापूर शहरात उद्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी येत आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण विजापूर शहर एखाद्या नववधूसारखे सजले असून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

उद्या सकाळी ११.३० वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे विजापूरमध्ये आगमन होईल. यावेळी मध्यवर्ती बसस्थानकाला कित्तूर राणी चन्नम्मा यांचे नाव देऊन त्यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल. या सोहळ्याला सुरेश भैरती, रामलिंगा रेड्डी, एच. सी. महादेवप्पा यांच्यासह अनेक कॅबिनेट मंत्री उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२.३० वाजता दरबार हायस्कूलच्या मैदानावर भव्य जाहीर सभा आणि विकासकामांचे भूमिपूजन पार पडेल.

राज्याचे माजी मुख्यमंत्री डी. देवराज अर्स यांचा प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम सिद्धरामय्या यांनी मोडल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील मनगुळी येथील कॅनरा बँक आणि चडचण येथील एसबीआय बँक दरोड्याचा तपास लावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचाही यावेळी गौरव केला जाईल.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात बॅनर आणि कटआउट्स लावण्यात आले असून सर्व प्रमुख चौकांमध्ये राणी चन्नम्मांचे ध्वज फडकवण्यात आले आहेत. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने मार्गांमध्ये बदल केला असून पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. ऐतिहासिक नगरी आता आपल्या लाडक्या नेत्याच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.

Tags: